Sunday, December 28, 2008

कांद्याच्या पातीची सोप्पी कोशिंबीर

कांद्याच्या पातीची ही कोशिंबीर करायला अगदी सोपी आणि पटकन होणारी अशी आहे.



साहित्य- घरात सहजी उपलब्ध असणारेच-

कांद्याची पात - १ जुडी
दाण्याचं कूट - २ - ३ चमचे
कच्चं तेल - १ चमचा
गोडा मसाला - १ छोटा चमचा
तिखट - १ छोटा चमचा
लिंबाचा रस - १ छोटा चमचा
मीठ - चवीनुसार
साखर - २ चिमूट

कृती - कांद्याची पात स्वच्छ पुसून चिरून घ्यावी. त्यात वरील सर्व जिन्नस - दाण्याचं कूट, कच्चे तेल, गोडा मसाला, तिखट, मीठ, लिंबाचा रस आणि साखर घालावे.
घरच्या सर्वांना 'चला जेवायला' अशी हाक मारून, सगळे येईपर्यंत ही कोशिंबीर ढवळून ठेवावी. :)

करायला एकदम सोप्पी आणि फोडणी वगैरेची भानगड नसल्याने पटकन होणारी.. आणि चवीलाही अतिशय छान लागते.

Tuesday, December 23, 2008

टोमॅटोचे सार

साहित्य :
टोमॅटो ४ मध्यम आकाराचे
कांदे २ मध्यम आकाराचे
आले १ इंच
लसुण पाकळ्या ४ ते ५
तिखट पाव चमचा
नारळाचा चव अर्धी वाटी
साखर आणि मीठ चवीनुसार
फोडणीसाठी -
तूप २ चमचे, जिरे, हिंग, कढीपत्त्यची ७-८ पाने, सुक्या मिर्च्या २-३ तुकडे, कोथिंबीर,
३-४ लवंगा, ३-४ काळी मिरी, दालचिनी लहानसा तुकडा, २ वेलदोडे

कृती :
टोमॅटो, कांदे यांच्या मोठ्या फोडी करुन उकडाव्यात. उकडतानाच त्यात आले, लसुण घालावे.
उकडल्यानंतर टोमॅटोची साले काढावीत.
मिक्सरच्या भांड्यात टोमॅटोचा गर, कांदे, आले, लसुण आणि नारळाचा चव घालून, त्याची पेस्ट करावी. त्यात गरजेनुसार पाणी घालावे आणि चवीनुसार साखर, मीठ, तिखट घालून मिश्रण उकळण्यास ठेवावे.
आता फोडणी करावी.
छोट्या कढल्यात तूप गरम करुन त्यात फोडणीचे साहित्य घालावे.
ती फोडणी उकळणार्‍या मिश्रणात एकत्र करावी आणि अजून एक उकळी काढावी.

टीप : फोडणी करतानाच त्यात कोथिंबीर घातल्यास ती हिरवी राहते.


ही पाककृती मिसळपाव या संकेतस्थळावर सुद्धा वाचता येईल.

Monday, December 22, 2008

नारळाच्या वड्या


साहित्य :- एका नारळाचा चव जेवढा चव आहे तेवढी साखर२ मध्यम आकाराचे बटाटे (उकडून व साले काढून)थोडी वेलची पूड थोडी जायफळ पूड.

एका ताटाला तूप लाऊन तयार ठेवावे.

कृती :- बटाटे कुस्करुन एकजीव करुन घ्यावेत.एका कढईमध्ये नारळाचा चव, साखर व कुस्करलेले बटाटे घेउन, मध्यम आचेवर ठेवावे. हे मिश्रण सतत ढवळावे.मिश्रण आळत आले की (कढईच्या बाजूला साखर-साखर दिसायला लागली की योग्य वेळ आली आहे असे समजावे.)गॅस बंद करुन मग त्यात वेलची पूड आणि जायफळ पूड मिसळावी.मिश्रण शेगडीवरुन खाली उतरवून पाच मिनिटे चांगले घोटावे.
तूप लावलेल्या ताटावर मिश्रण पसरवून वाटीने थापून घ्यावे. गरम असतानाच वड्या पाडाव्यात.

टिप्पणी :- या वड्यांमध्ये बटाटा घातल्याने त्या खुसखुशीत होतात.


ही पाककृती मिसळपाव या संकेतस्थळावर सुद्धा वाचता येईल.