Wednesday, February 18, 2009

मसालेभात



साहित्य:-
१ वाटी बासमती तांदूळ
अर्धी वाटी चौकोनी आकारात चिरलेला कोबी (ऐच्छिक)
१ लहान भोपळीमिरची चौकोनी आकारात चिरून
मूठभर मटाराचे दाणे
३ मोठे चमचे कोरडं खोबरं
१ चमचा धने, जिरे,
३/४ लवंगा, काळी मिरी
लहान तुकडा दालचिनी
१ चमचा दही
१०-१२ काजू
२-३ हिरव्या मिरच्या
५-६ कढिपत्त्याची पाने
१ इंच आलं - किसून
१ चमचा गोडा आणि गरम मसाला
१ चमचा साखर
चवीनुसार मीठ
२ मोठे चमचे तेल
फोडणीचे साहित्यः- मोहरी, जिरे, हिंग, हळद, तमालपत्र.

कृती:-
तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास निथळत ठेवावेत.
एका कढल्यात कोरडं खोबरं, धने-जिरे, लवंग काळीमिरी, दालचिनी असे वेगवेगळे भाजून घ्यावे आणि गार झाल्यावर मिक्सरमधून काढावे. एका गॅसवर २ वाट्या पाणी गरम करण्यास ठेवावे.
कूकरमधे तेल गरम करून मोहरी, जिरं, हिंग, हळद, तमालपत्र घालून फोडणी करून घ्यावी. त्यात हिरवी मिरची, किसलेलं आलं घालावे. का़जू घालून ते चांगले परतून घ्यावेत. त्यात कोबी, भो.मिरच्यांचे तुकडे, मटाराचे दाणे घालून चांगले परतून घ्यावे. आता त्यात भिजवलेले तांदूळ घालून चांगले परतून घ्यावे. त्यात मिक्सरमधून वाटून घेतलेला मसाला घालावा. आता यात चांगले गरम झालेले पाणी घालावे.
या मिश्रणाला उकळी आली की त्यात गोडा मसाला, गरम मसाला, फेटलेले दही, १ चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालावे.
कुकरला झाकण लावून २ शिट्ट्या होऊ द्याव्यात.
भात मुरल्यावर एका ताटात भाताची मूद पाडून त्यावर ओलं खोबरं, कोथिंबीर आणि तूप घालून गरम असतानाच फस्त करावा. Smile

टीप:- मसालेभातात शक्यतो हिरवी मिरचीच घालावी. तिखट घातल्याने रंग बदलतो.