Friday, January 23, 2009

कानडी सांबार



साहित्य :-
१ लहान वाटी तुरीची डाळ
१+१ कांदा
१ टोमॅटो
२ लहान बटाटे
अर्धी वाटी ओले खोबरे
१ लहान चमचा धने
१ लहान चमचा जिरे
२ चमचे सांबार पावडर
१ चमचा रसम् पावडर (रसम् पावडर नसल्यास सांबार पावडर त्यानुसार जास्त)
छोट्या लिंबाएवढी चिंच
चवीनुसार मीठ
फोडणीसाठी- २ चमचे तेल, मोहरी, हिंग, हळद
१ चमचा तिखट

कृती:-
तुरीची डाळ शिजवून, घोटून घ्यावी. बटाटे उकडून फोडी करून घ्याव्यात.
एक कांदा चिरून घ्यावा. चिंचेचा कोळ करून घ्यावा.
मिक्सरच्या भांड्यात एका कांद्याच्या फोडी, टोमॅटोच्या फोडी, ओले खोबरे, धने, जिरे, सांबार आणि रसम पावडर असे घालून, गरजेनुसार पाणी घालून मऊ, मुलायम पेस्ट करून घ्यावी.
एका पातेल्यात तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. त्यात कांद्याच्या फोडी घालून चांगले परतून घ्यावे. त्यानंतर त्यात वाटून घेतलेली पेस्ट घालावी. थोडे परतावे. परतताना त्यात थोडे पाणी घालावे म्हणजे खाली लागणार नाही. या मिश्रणात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालाव्यात. चिंचेचा कोळ घालावा. त्यानंतर घोटून घेतलेली डाळ घालावी. चवीप्रमाणे मीठ आणि एक लहान चमचा तिखट घालावे.गरजेनुसार पाणी घालावे. गरज वाटल्यास वरूनही थोडा सांबार मसाला घालावा. सांबाराला खळखळून उकळी येऊ द्यावी.
गरम गरम भाताबरोबर गरमागरम सांबार वाढावे. किंवा इडल्यांबरोबर आस्वाद घ्यावा.

Sunday, January 11, 2009

तिखटा-मिठाचा दलिया



साहित्य :-

१ वाटी दलिया
१ मध्यम कांदा चिरून
१ टोमॅटो बारीक चिरून
घरात असतील त्या सर्व भाज्या-
प्रत्येकी अर्धी वाटी भोपळी मिरची बारीक चिरून, फ्लॉवरचे तुरे, गाजराचे तुकडे, बेबी कॉर्नचे तुकडे
१ ते २ चमचे मक्याचे दाणे
थोडे मटाराचे दाणे
सजावटीसाठी खोबरे, कोथिंबीर
फोडणीसाठी तेल
फोडणीचे साहित्य- मोहरी, जिरे, हिंग, हळद, लाल मिरचीचे २/३ तुकडे, ५ ते ६ कढिपत्त्याची पाने
अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा साखर, चवीपुरते मीठ

कृती :-

एका भांड्यात दलिया घेऊन तो चांगला भाजून घ्यावा (उपम्यासाठी रवा भाजतो तसा). एकीकडे सव्वादोन वाट्या पाणी घेऊन ते तापण्यास ठेवावे.
दलिया चांगला तांबूस भाजला गेला की त्यात कढत पाणी घालून २ वाफा आणाव्यात. म्हणजे तो चांगला फुलेल.
फ्लॉवरचे तुरे, गाजराचे तुकडे, बेबी कॉर्नचे तुकडे,मक्याचे दाणे व मटाराचे दाणे वाफवून घ्यावे.
एका भांड्यात तेल तापवून फोडणी करून घ्यावी. त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. त्यानंतर भोपळी मिरचीचे तुकडे व नंतर टोमॅटो घालून परतावे.
त्यात वाफवून घेतलेल्या भाज्या घालाव्यात. त्यात चवीपुरते मीठ, साखर व तिखट घालावे.
त्यानंतर त्यात उकडून घेतलेला दलिया घालावा. चांगले ढवळून घ्यावे. १ वाफ आणावी.
वरून खोबर, कोथिंबीर घालून, लिंबू पिळून गरमागरम सर्व्ह करावे

हा तिखटा-मिठाचा दलिया अतिशय पौष्टिक असतो. तो पोटभरीचा होतो आणि चविष्ठ लागतो.
गव्हाच्या खिरीसाठी उकडतो तसा दलिया कुकरातून शिट्ट्या करून उकडून घेतला तरी चालतो.
उकडलेला दलिया फ्रिज मध्ये २ दिवस राहू शकतो.
वर सांगितलेल्या सगळ्या भाज्या घरात नसतील तरी घरी उपलब्ध असलेल्या भाज्या घालून करता येतो.

Thursday, January 8, 2009

पालक कॉर्न पुलाव

नमस्कार खवय्यांनो,
तुमच्यासाठी पालक कॉर्न पुलावाची कृती देत आहे, कशी वाटली ते जरूर कळवा.



साहित्य:-
१ वाटी बासमती तांदुळ
अर्धी जुडी पालकाची पाने
अर्धी वाटी मक्याचे दाणे
अर्धी वाटी गाजराचे उभे पातळ चिरलेले काप
अर्धी वाटी कोथिंबीर
१०-१२ पुदीन्याची पाने
१ इंच आलं
७-८ लसूण पाकळ्या
५-६ हिरव्या मिरच्या
३ टे.स्पून तेल
चवीप्रमाणे मीठ
पूर्वतयारी :-
एका मिक्सरच्या भांड्यात आलं, लसूण, हिरवी मिरची, पुदीना, कोथिंबीर याची पेस्ट करून घेणे.
पालकाची पाने स्वच्छ धुवून त्याची पेस्ट करून घेणे.
मक्याचे दाणे आणि गाजराचे काप वाफवून घेणे.
बासमती तांदुळाचा फडफडीत भात शिजवून तो एका परातीत मोकळा करून घ्यावा.
कृती :-
एका नॉन स्टिक पॅन मध्ये तेल गरम करून घेणे. तेल चांगले गरम झाले की त्यात आलं, लसूण, हिरवी मिरची, पुदीना, कोथिंबीर याची केलेली पेस्ट घालणे. चांगले परतून घेणे.
यात वाफवून घेतलेले मक्याचे दाणे आणि गाजराचे काप घालणे. १ मिनिटभर परतणे. त्यानंतर यात तयार केलेली पालकाची पेस्ट घालणे. परतून घेणे आणि दोन वाफा आणणे.
चवीनुसार मीठ घालणे. आता या मिश्रणात शिजवलेला भात घालून एकजीव करणे. भाताची शिते मोडणार नाहीत याची काळजी घेणे.गॅस बंद करून आता या पुलावात लिंबाचा रस घालून परत एकदा अलगद ढवळणे.

एका डीश मध्ये काढून, त्यावर कोथिंबीर भुरभुरवून सजवणे आणि गरमागरम पुलावाचा आस्वाद घेणे.
गाजर, पालक आणि कॉर्न यांच्या रंगामुळे हा पुलाव एकदम रंगीबेरंगी दिसतो.
टीप:-
पालक मूळचा थोडा खारट असल्याने मीठ घालताना काळजी घ्यावी.