Wednesday, June 24, 2009
कारल्याची कोशिंबीर
साहित्य :-
२ ते ३ कारली
१ मध्यम कांदा - बारीक चिरून
१ मोठा चमचा दाण्याचे कूट
अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर
२ चमचे लिंबाचा रस
२ मिरच्या
चवीप्रमाणे मीठ
२ चमचे तेल
फोडणीचे साहित्य - मोहरी, जिरे, हिंग, हळद
कृती:-
कोशिंबीर करायच्या आधी २ ते २.५ तास कारली उभी मधे चिरून घ्यावी. आतील बिया काढून काचर्या करून घ्याव्यात. ह्या काचर्यांना मीठ लावून ठेऊन द्यावे.
२ ते २.५ तासांनी ह्या मीठ लावलेल्या काचर्या पिळून त्यातील मिठाचे पाणी काढून टाकावे. म्हणजे कारल्याचा कडूपणा कमी होईल.
एका कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग घालून फोडणी करून घ्यावी. त्यात कारल्याच्या काचर्या कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्याव्यात.
कढई गॅस वरून काढून घ्यावी. आता त्यात बारीक चिरलेला कांदा, दाण्याचे कूट, कोथिंबीर आणि बारीक चिरलेल्या मिरच्या घालाव्यात. गरज वाटल्यास चवीनुसार मीठ घालावे. (कारल्याच्या काचर्यांना आधी मीठ लावलेले असल्याने चव बघून मीठ घालावे.)
आता त्यावर लिंबाचा रस घालावा. सर्व मिश्रण एकजीव करून कोशिंबीर वाढावी.
कारल्याचा थोडासा कडूपणा, लिंबाची आंबट चव, मिरच्यांचा तिखटपणा आणि खमंग फोडणी यांच्या एकत्रित चवीमुळे ही कोशिंबीर फारच चविष्ट लागते.
अननसाचा शिरा
साहित्यः-
१ वाटी जाड रवा
पाऊण वाटी अननसाच्या फोडी
अर्धी वाटी साजूक तूप
१ वाटी साखर
दीड वाटी दूध
अर्धी वाटी पाणी
कृती:-
प्रथम एका जाड बुडाच्या मोठ्या पातेल्यात अथवा कढईत रवा कोरडा भाजून घ्यावा.
मिक्सरच्या भांड्यात अननसाच्या फोडी घालून त्याची चांगली पेस्ट करून घ्यावी.
एका कढईत तूप घालून ते थोडे गरम झाले की त्यात अननसाची पेस्ट घालावी. दुसर्या गॅसवर एका पातेल्यात दूध आणि पाणी एकत्र करून मध्यम आचेवर गरम करायला ठेवावे. तुपात घातलेली अननसाची पेस्ट चांगली परतून घ्यावी. आता त्यात भाजलेला रवा घालून तो साधारण एक ते दोन मिनिटे परतावा. त्याला छान तांबूस रंग येईल.
तोवर पाणी+दूध याला एक उकळी आली असेल. हे उकळी आलेले मिश्रण रव्यात घालावे. रवा चांगला फुलून येईल. त्यावर झाकण ठेऊन एक वाफ येऊ द्यावी.
त्यानंतर त्यात साखर घालून चांगले ढवळावे. परत एकदा झाकण ठेऊन एक वाफ येऊ द्यावी.
अननसाचा शिरा तयार आहे.
शिरा थोडा कोमट असतानाच मोदकाच्या साच्यात घालून शिर्याचे मोदक करावेत.
अश्याच पद्धतीने आंब्याचा रस घालून केलेला 'आम्रशिरा' सुद्धा खूप चविष्ट लागतो.
Tuesday, June 2, 2009
भरली भेंडी
साहित्य :-
भेंडी - स्वच्छ पुसून, डेखं काढून आणि मधे उभ्या चिरून
डाळीचं पीठ - पाव किलो भेंडीसाठी साधारण ३ चमचे
जाड/बारीक - रवा अर्धा चमचा
कोरडं खोबरं - २ चमचे
धने पावडर - अर्धा लहान चमचा
जिरे पावडर , गरम मसाला, लाल तिखट, हळद, चाट मसाला - प्रत्येकी १ लहान चमचा
बारीक चिरलेली कोथिंबीर
साखर - अर्धा चमचा
मीठ - चवीनुसार
साजूक तूप - १ चमचा
फोडणीचे साहित्य- तेल, मोहरी, जिरे, हिंग
कृती :-
एका कढल्यात डाळीचं पीठ, रवा आणि कोरडं खोबरं वेगवेगळे भाजून घेणे. भाजून झाल्यावर हे तिन्ही जिन्नस एकत्र करून त्यात धने-जिरे पावडर, गरम मसाला, लाल तिखट, हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरते मीठ, थोडीशी साखर घालून एकत्र करणे. हे तयार मिश्रण मधे उभ्या चिरलेल्या भेंडीत दाबून भरणे.
एका कढईत नेहमीपेक्षा थोडे जास्त तेल घालून तेल तापले की फोडणी करून घेणे. त्यात भरून ठेवलेल्या भेंड्या घालणे. गॅस मोठा ठेऊनच परतणे.
भेंड्या छान परतल्या गेल्या की बाजूने साजूक तूप घालणे.
गॅस बंद केल्यावर वरून चाट मसाला, मीठ व हवे असल्यास लाल तिखट भुरभुरावे.
गरम असतानाच ताव मारावा. Smile
टीप :-
या भेंड्यांना पाण्याचा हात न लावल्याने अजिबात तार येत नाही. तरीही तार सुटलीच तर वरून थोडासा लिंबाचा रस घालावा.
Subscribe to:
Posts (Atom)