Wednesday, June 24, 2009

कारल्याची कोशिंबीर
साहित्य :-
२ ते ३ कारली
१ मध्यम कांदा - बारीक चिरून
१ मोठा चमचा दाण्याचे कूट
अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर
२ चमचे लिंबाचा रस
२ मिरच्या
चवीप्रमाणे मीठ
२ चमचे तेल
फोडणीचे साहित्य - मोहरी, जिरे, हिंग, हळद

कृती:-
कोशिंबीर करायच्या आधी २ ते २.५ तास कारली उभी मधे चिरून घ्यावी. आतील बिया काढून काचर्‍या करून घ्याव्यात. ह्या काचर्‍यांना मीठ लावून ठेऊन द्यावे.
२ ते २.५ तासांनी ह्या मीठ लावलेल्या काचर्‍या पिळून त्यातील मिठाचे पाणी काढून टाकावे. म्हणजे कारल्याचा कडूपणा कमी होईल.

एका कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग घालून फोडणी करून घ्यावी. त्यात कारल्याच्या काचर्‍या कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्याव्यात.
कढई गॅस वरून काढून घ्यावी. आता त्यात बारीक चिरलेला कांदा, दाण्याचे कूट, कोथिंबीर आणि बारीक चिरलेल्या मिरच्या घालाव्यात. गरज वाटल्यास चवीनुसार मीठ घालावे. (कारल्याच्या काचर्‍यांना आधी मीठ लावलेले असल्याने चव बघून मीठ घालावे.)
आता त्यावर लिंबाचा रस घालावा. सर्व मिश्रण एकजीव करून कोशिंबीर वाढावी.

कारल्याचा थोडासा कडूपणा, लिंबाची आंबट चव, मिरच्यांचा तिखटपणा आणि खमंग फोडणी यांच्या एकत्रित चवीमुळे ही कोशिंबीर फारच चविष्ट लागते.

No comments:

Post a Comment