Wednesday, June 24, 2009

अननसाचा शिरा



साहित्यः-
१ वाटी जाड रवा
पाऊण वाटी अननसाच्या फोडी
अर्धी वाटी साजूक तूप
१ वाटी साखर
दीड वाटी दूध
अर्धी वाटी पाणी

कृती:-
प्रथम एका जाड बुडाच्या मोठ्या पातेल्यात अथवा कढईत रवा कोरडा भाजून घ्यावा.
मिक्सरच्या भांड्यात अननसाच्या फोडी घालून त्याची चांगली पेस्ट करून घ्यावी.
एका कढईत तूप घालून ते थोडे गरम झाले की त्यात अननसाची पेस्ट घालावी. दुसर्‍या गॅसवर एका पातेल्यात दूध आणि पाणी एकत्र करून मध्यम आचेवर गरम करायला ठेवावे. तुपात घातलेली अननसाची पेस्ट चांगली परतून घ्यावी. आता त्यात भाजलेला रवा घालून तो साधारण एक ते दोन मिनिटे परतावा. त्याला छान तांबूस रंग येईल.
तोवर पाणी+दूध याला एक उकळी आली असेल. हे उकळी आलेले मिश्रण रव्यात घालावे. रवा चांगला फुलून येईल. त्यावर झाकण ठेऊन एक वाफ येऊ द्यावी.
त्यानंतर त्यात साखर घालून चांगले ढवळावे. परत एकदा झाकण ठेऊन एक वाफ येऊ द्यावी.
अननसाचा शिरा तयार आहे.

शिरा थोडा कोमट असतानाच मोदकाच्या साच्यात घालून शिर्‍याचे मोदक करावेत.
अश्याच पद्धतीने आंब्याचा रस घालून केलेला 'आम्रशिरा' सुद्धा खूप चविष्ट लागतो.

No comments:

Post a Comment